
विविध स्पर्धांमध्ये खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
डेरवण ः डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित क्रीडा सप्ताहाला खेळाडू आणि प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रीय लगोरी स्पर्धेने करण्यात आला.
या स्पर्धेत देशभरातील १२ राज्यांमधून ३५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. प्राचीन आणि स्वदेशी खेळ लगोरी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे डेरवणला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळाला आहे.
अॅथलेटिक्स स्पर्धांना विशेष उत्साह
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून २४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील २८० खेळाडूंनी आपली क्षमतांची चुणूक दाखवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंची निवड राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धेत आघाडीवर
२८ ते ३० ऑगस्ट दरम्यान बी के एल वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, फिजिओथेरपी कॉलेज आणि समर्थ नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध खेळांचे आयोजन करण्यात आले। बास्केटबॉल, फुटबॉल, रस्सीखेच, लगोरी, अॅथलेटिक्स, कबड्डी आणि खो-खो अशा खेळांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
क्रीडा भावना आणि शिस्तीचे दर्शन
या सर्व स्पर्धांमधून खेळाडूंच्या क्रीडाभावना, टीमवर्क, शिस्त आणि उत्साहाचे उत्तम प्रदर्शन झाले. डेरवण येथे झालेला हा क्रीडा सप्ताह खेळाडू आणि क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला आहे. स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलामुळे जिल्ह्याच्याच नव्हे तर विभागातील क्रीडा संस्कृतीला नवे आयाम मिळाले आहेत अशा भावना ज्येष्ठ क्रीडा संघटक संदीप तावडे यांनी व्यक्त केल्या.