
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण
पुणे ः “राज्यातील यशस्वी खेळाडूंना देण्यात येणारी २२ कोटी रुपयांची रोख बक्षिसे ही त्यांच्या कठोर परिश्रमाची खरी प्रशंसा आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी येथे केले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खचाखच भरले होते. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या क्रीडा दिन समारंभात ३३१ आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. या खेळाडूंना एकूण २२ कोटी ३१ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १३ आंतरराष्ट्रीय आणि ३१८ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना बक्षिसे प्रदान केली. सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी ७ लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना ५ लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्यांना ३ लाख रुपये बक्षिसे देण्यात आली. ”मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटर” या महत्त्वाकांक्षी योजनेच्या लोगोचे अजित पवार आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे, आमदार बाबाजी काळे, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपाध्यक्ष संजय शेटे, राज्य स्क्वॉश संघटनेचे सरचिटणीस दयानंद कुमार, महाराष्ट्र राज्य स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे, पुणे जिल्हा स्क्वॉश संघटनेचे सचिव ॲड आनंद लाहोटी आदी मान्यवर उपस्थित होते.