
छत्रपती संभाजीनगर ः ग्राम पंचायत अंबेलोहळ, राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन आणि जिल्हा परिषद प्रशाला अंबेलोहळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये खेळ व खेळाविषयी रुची निर्माण व्हावी,
ग्रामीण भागातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व स्थानिक खेळाडूंचा सत्कार समारंभ जिल्हा परिषद प्रशाला अंबेलोहळ येथे उत्साहात पार पडला .
या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी विद्यार्थ्यांना दररोज किमान १२ सूर्य नमस्कार करण्याचा व योग्य आहार घेण्याचा सल्ला दिला. मॅरेथॉन धावपटू सतीश यादव यांनी सरावामध्ये सातत्य हेच यशाचे रहस्य आहे असे सांगितले. मराठवाड्यातील सर्वात युवा आयर्नमॅन दर्शन घोरपडे याने लहानपणापासूनच वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकून मी आंतराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धा यशस्वी करू शकलो. मी करू शकतो तर तुम्ही पण करु शकता असा सल्ला दिला.
या कार्यक्रमात मुद्दसर काझी (हॉकीपटू), शैलेंद्र शेजवळ (धावपटू), किशोर शेजवळ(धावपटू) या खेळाडूंची यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्रशाला अंबेलोहळचे मुख्याध्यापक आर आर दुम्मलवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी सरपंच प्रतिभा ताई दाभाडे, ग्रामपंचायत अंबेलोहळचे सर्व सदस्य व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य विष्णू पाटील प्रधान, वसीम कुरेशी, युनूस शेख, चंदन दाभाडे, असलम पटेल, अनिस पटेल आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भोसले यांनी केले. गोपालकृष्ण नवले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबेलोहळच्या सर्व शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले.