पुण्यात खासदार क्रीडा महोत्सवाचे नोव्हेंबरमध्ये आयोजन

  • By admin
  • August 31, 2025
  • 0
  • 38 Views
Spread the love

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : “विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट युवा फॉर विकसित भारत’ अशी साद घालत ‘खासदार क्रीडा महोत्सव’ उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. मोदीजींची ‘फिट इंडिया’ची संकल्पना साकार होण्यासाठी पुण्यात पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ येत्या नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे दीपोत्सवानंतर पुणेकरांना खेलोत्सव अनुभवता येणार आहे,” अशी महिती केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने डेक्कन जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रमुख समन्वयक व छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे, ऑलिंपिक खेळाडू व अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे, भारतीय हॉकी संघाच्या माजी कर्णधार व अर्जुन पुरस्कार विजेता रेखा भिडे, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते विलास कथुरे, माजी क्रिकेटपटू केदार जाधव, कुस्तीगीर संघाचे संदीप भोंडवे, हिंदकेसरी योगेश दोडके आदी उपस्थित होते. संयोजन समितीमध्ये नेमबाज व खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू सुरेखा द्रविड, बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे यांच्यासह पुण्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी ‘फिट इंडिया’ अंतर्गत खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन होत आहे. या महोत्सवात खेळाडूंसोबत ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग अशा सर्वांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. भारतीय खेळांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांच्या स्पर्धा होतील. ३३ प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी बुद्धिबळ व कॅरम, दिव्यांगांसाठी बास्केटबॉल व पोहण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे.”

मनोज एरंडे म्हणाले, “खासदार क्रीडा महोत्सवात ३३ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यात सुमारे वीस तें पंचवीस हजार खेळाडू सहभागी होतील. संयोजन समितीचे प्रमुख मुरलीधर मोहोळ स्वतः खेळाडू, पैलवान असल्याने त्यांना खेळाडूंबद्दल आपुलकी आहे. ही स्पर्धा चांगली होण्यासाठी त्यांचे सूक्ष्म नियोजन महत्वपूर्ण ठरेल. या स्पर्धेत खेळ, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना सर्वोच्च प्राधान्य असेल.”

मनोज पिंगळे म्हणाले, “देशात प्रतिभावान खेळाडूंची कमतरता कधीच नव्हती. मात्र त्यांना सरकारकडून आवश्यक तसे साहाय्य मिळत नव्हते. मोदीजींनी खेळांना महत्व दिले, खेळाडूंना लागणाऱ्या सुविधा दिल्या. त्याचे परिणाम आपल्याला पदकांच्या रूपाने बघायला मिळत आहेत. गेल्या अकरा वर्षात सर्वच खेळांना लोकप्रियता मिळू लागली आहे. देशात क्रीडा संस्कृती प्रभावीपणे रुजत आहे.”

विलास कथुरे म्हणाले की, देशात क्रीडा क्षेत्राचाही झपाट्याने विकास होत आहे. ग्रामीण भागातही पायाभूत सुविधा तयार होत असल्याने खेळाडूंना त्यांची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळू लागले आहे. खेळाची संस्कृती महानगरातून गाव पातळ्यांवर रुजताना दिसत आहे. त्याचे चांगले परिणाम म्हणजे दुर्गम भागातील खेळाडूही पदकांची कमाई करताना दिसत आहेत.”

प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणारा महोत्सव
नरेंद्र मोदी यांनी देशातील क्रीडा विकासाचा रोडमॅप मांडला. खेलो इंडिया सारख्या स्पर्धा सुरू केल्या. खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या. तालुका पातळीवरही या सुविधा विकसित होण्यासाठी अर्थसहाय्य द्यायला सुरूवात केली. मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरवात केली. खासदार क्रीडा महोत्सव हा देशातील प्रतिभावान युवा खेळाडूंचा शोध घेणारा महोत्सव आहे. त्यातून देशाला ऑलिंपिक स्पर्धेसारख्या सर्वोच्च जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याचे देशवासीयांनी पाहिले.

  • मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *