
सासवड ः राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने वाघिरे महाविद्यालय, सासवड येथे जिल्हास्तरीय सायकल संगीत खुर्ची चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली.
पुरुष गटात समीर जाधव याने तर महिला गटात साक्षी कापरे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. “नाते जोडू सायकलशी, नाते जोडू आरोग्याशी” हे घोषवाक्य घेऊन पुण्याची, “सायकलचा जिल्हा व शहर” ही पुसत चाललेली ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमात पुणे जिल्ह्यातून ८४ मुली व मुलांनी सहभाग घेतला. सायकल संगीत खुर्ची ही स्पर्धा पहिल्यांदा पाहिली अशी प्रतिक्रिया स्पर्धकांनी व त्यांच्या पालकांनी दिली.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ पंडित शेळके यांनी, “सायकल संगीत खुर्ची चषक ही स्पर्धा म्हणजे जशी अविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग केले जातात. तोच विडा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने खेळाच्या क्षेत्रात उचलला असून भारताला मेजर ध्यानचंद यांच्या सारखा ऑलिंपियन देणे हे स्वप्न ही संस्था उराशी बाळगून आहे” असे मत व्यक्त केले.
प्रत्येक सहभागी स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले. विजयी खेळाडूंना चषक व क्रीडा साहित्य देण्यात आले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ बी यु माने, डॉ संजय झगडे, डॉ बी एल शिंदे, अशोक कोंढावळे, मीरा चिकने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा प्रीतम ओव्हाळ, लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे, नवनाथ उरसळ, मच्छिंद्र जगताप, अनुष्का पवार, सलोनी राऊत, श्रद्धा देवडे, शैलेंद्र राऊत यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
पुरुष गट : प्रथम क्रमांक – समीर दीपक जाधव, द्वितीय क्रमांक – प्रतीक बापू मोटे, तृतीय क्रमांक – अनिकेत अनिल पवार.
महिला गट : प्रथम क्रमांक – साक्षी मधुकर कापरे, द्वितीय क्रमांक – हर्षदा दत्तात्रय मुळीक, तृतीय क्रमांक – निकिता गणेश भिंताडे.