
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या गौरव समारंभात शेख हम्माद अली याला राष्ट्रीय खेळाडू म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शेख हम्माद याने डिसेंबर २०२४ मध्ये तरण तारण पंजाब येथे २४ वी राष्ट्रीय सब ज्युनियर वुशू स्पर्धेत २१ किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवून महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले होते. या शानदार कामगिरीबद्दल हम्माद अली याला राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार देण्यात आला.
वुशू असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगरचे सचिव महेश इंदापुरे, झेड एस वॉरियर्स अकॅडमीचे अध्यक्ष सय्यद जहूर अली, अली फरहाद वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल मुकित अली, सहसचिव फरहत समरीन, हम्मादचे प्रशिक्षक सद्दाम, रिझवान, सुमित खरात, झैद सर, अजिंक्य नितनवरे व न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर सुम्मया मॅडम यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या पुरस्काराबद्दल हम्मादचे सर्वत्र कौतुक होत आहे.