
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व तेजस्विनी सायकलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सायकल रॅलीला विभागीय क्रीडा संकुल येथून प्रारंभ झाला. त्यानंतर सायकल रॅली गारखेडा चौक, गजानन महाराज मंदिर चौक, सेवन हिल आणि पुन्हा त्याच मार्गाने विभागीय क्रीडा संकुल असा होता. या उपक्रमात शहरातील नागरिक, विद्यार्थी, खेळाडू व सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या रॅलीद्वारे क्रीडा संस्कृती जतन व निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला. यावेळी तेजस्विनी सायकलिंग क्लबच्या अध्यक्षा नीता गंगावणे व
इतर क्लबचे सदस्य व शहरातील नामांकित सायकल रायडर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ प्रांजल कोटेचा, डॉ रूची महाजन व डॉ प्रज्ञा पाटील यांनी वैद्यकीय सेवा पुरविली. तसेच पोलीस प्रशासन व वाहतूक पोलीस विभागाने मोलाचे सहकार्य केले. सायकल जिल्हा संघटक भिकन अंबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.