
मुंबई ः श्रीकांत स्पोर्ट्स क्लब व सार्वजनिक गणेशोत्सव-कांदिवलीतर्फे लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत श्रीकांत चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा आयईएस चंद्रकांत पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या प्रसाद माने याने जिंकली.
अटीतटीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी अचूक फटके साधत प्रसाद मानेने प्रथम मानांकित पोद्दार अकॅडमी-मालाड शाळेच्या प्रसन्न गोळेचे आव्हान १७-१६ असे संपुष्टात आणले आणि रोख रुपये दोन हजारांसह अजिंक्यपद पटकाविले. प्रारंभ दमदार करूनही हातचे बोर्ड निसटल्यामुळे प्रसन्न गोळे याला रोख रुपये एक हजारासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या स्पर्धेत मुंबई शहर व उपनगरसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६४ खेळाडूंनी भाग घेतला होता. विजेत्या-उपविजेत्यांना एलआयसीचे मार्केटिंग हेड संतोष आचरेकर, श्रीकांत स्पोर्ट्स क्लबचे सर्व पदाधिकारी व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
एलआयसी-श्रीकांत चषक कॅरम स्पर्धेची प्रसाद माने विरुद्ध पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम यामधील उपांत्य लढत देखील चुरशीची झाली. ९-० असा धडाकेबाज प्रारंभ करणाऱ्या अमेय जंगमला पाचव्या बोर्डमध्ये प्रसाद मानेने १४-१४ असे बरोबरीत रोखले. सहाव्या निर्णायक बोर्डमध्ये ब्रेकचा पुरेपूर लाभ उठवीत प्रसाद मानेने २१-१४ असा सनसनाटी विजय मिळविला. दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये सुरुवातीपासून मोठी आघाडी घेत प्रसन्न गोळेने युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरच्या वेदांत राणेचा २१-९ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेतील उपांत्य उपविजेते अमेय जंगम व वेदांत राणे तर उपांत्यपूर्व उपविजेते पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा नील म्हात्रे, डॉ दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ओमकार देसाई, पोद्दार अकॅडमी-मालाडचा पुष्कर गोळे व ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल-दहिसरचा तीर्थ ठक्कर हे पुरस्काराचे मानकरी ठरले. सर्व सहभागी खेळाडूंना एलआयसी पुरस्कृत कॅरम स्ट्रायकरची भेट देण्यात आली. माजी केंद्रीय राज्य अर्थमंत्री आनंदराव अडसूळ, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, अध्यक्ष तेजस शाह, सचिव प्रणव निकुंभ, पंच प्रमुख अविनाश महाडिक आदींनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.