नंदुरबार : नंदुरबार जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा येत्या ७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
नंदुरबार येथील श्री यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात रविवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत ही पंच परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत ६०० रुपयांची परीक्षा फी भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत प्रत्यक्ष परीक्षा स्थळी केली जाईल. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी राजेंद्र साळुंखे (7507036629), मयूर ठाकरे (9767677056), दीपक धुमाळ (9921641955) यांच्याशी संपर्क साधावा. या परीक्षेद्वारे जिल्ह्यातील नवीन पंच घडविणे व कबड्डी खेळाचा दर्जा उंचावणे हा हेतू असोसिएशनने व्यक्त केला आहे. कबड्डी खेळाच्या विकासासाठी पंचांची तयारी ही महत्त्वाची बाब असल्याने इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदुरबार जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह प्रा राजेंद्र साळुंखे यांनी केले आहे.