
महिला गटात युझुनो वातानाबे यांना विजेतेपद, मिश्र दुहेरीत भारताच्या वंश देव व श्रावणी वाळेकर यांना विजेतेपद
पुणे ः पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात जपानच्या काझुमा कावानो याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. महिला गटात जपानच्या युझुनो वातानाबे, याने तर, यांनी विजेतेपद संपादन केले. तर, मिश्र दुहेरीत भारताच्या वंश देव व श्रावणी वाळेकर यांनी, तर महिला दुहेरीत भारताच्या अन्या बिश्त व एंजल पुणेरा यांनी विजेतेपद पटकावले.
पी ई सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये अंतिम फेरीत अटीतटीच्या लढतीत पुरुष गटात नवव्या मानांकित जपानच्या काझुमा कावानोने जपानच्या दुसऱ्या मानांकित ह्युगा टाकानो याचा २३-२१, १८-२१, २५-२३ असा तीन गेममध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. काझुमा याने टाकानोला कडवी झुंज देत १ तास ९ मिनिटात त्याचे आव्हान मोडीत काढले.
१८ वर्षीय काझुमा हा फुटाबा फ्युचर शाळेत शिकत असून जपान स्पोर्ट्स ऑलिम्पिक स्क्वेअर या ठिकाणी प्रशिक्षक केनिची माओजीन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. पुरुष दुहेरीत अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित काझुमा कावानो व शुजी सावदा यांनी जपानच्या शुनसेई नेमोटो व नागी योशित्सुगु यांचा २१-१५, २१-१८ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
महिला गटात अंतिम सामन्यात जपानच्या युझुनो वातानाबे जपानच्या दहाव्या मानांकित युरीका नागाफुचीचा १६-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना १ तास चालला.
मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत भारताच्या वंश देव व श्रावणी वाळेकर या जोडीने भारताच्या सी लालरामसांगा व तारिणी सुरी या जोडीचा २१-१२, २१-१३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. अवघ्या २८ मिनिटांत वंश देव व श्रावणी वाळेकर यांनी विजय मिळवला. महिला दुहेरीत अंतिम लढतीत भारताच्या अन्या बिश्त हिने एंजल पुणेराच्या साथीत जपानच्या पाचव्या मानांकित एओई बन्नो व युझू उएनो यांचा २१-१३, २१-१२, २१-१७ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व एकूण १५ हजार डॉलर रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे, बॅडमिंटन एशियाच्या टीओसीचचे अध्यक्ष ओमर रशीद, पोलिस आयुक्त मनोज पाटील, अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, सुशांत चिपलकट्टीच्या आई डॉ मीना चिपलकट्टी, योनेक्स सनराइजचे बालकिशन चौधरी, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, लोकमान्य सहकारी पतपेढीचे क्षेत्रीय प्रमुख सुशील जाधव, लागू बंधूचे संचालक सारंग लागू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे सरचिटणीस सीए रणजीत नातु,स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग, स्पर्धा प्रमुख विवेक सराफ, सुधांशू मेडसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.