
रायगड ः जिल्हा क्रीडा परिषद, रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्याअनुषंगाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिक प्राप्त केलेल्या खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड येथे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन खासदार धैर्यशील पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यामध्ये रायगड जिल्ह्यातील डॉजबॉल या खेळाकरिता महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंचाही समावेश होता. ज्युनिअर गटात भक्ती पाटील व श्रेया खाकाळ तर वरिष्ठ गटात पुरुषांमध्ये वरद शिंपी, सर्वेश पाटील, आर्यन पाटील, करमण सिंग हुडल, मितांशू करपे, विक्रम जयस्वाल तसेच वरिष्ठ गटात महिलांमध्ये आरती पाटील, लास्या राव, तिथी प्रामाणिक, सायवी भोसले व श्रावणी दिवेकर यांनी राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांच्याकडून असा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. त्याबद्दल डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे सचिव संगम डंगर व डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष प्रशांत महल्ले यांनी आभार मानले व भविष्यात खेळाडूंना अशाच प्रकारे प्रोत्साहन देण्यात यावे अशी अशा व्यक्त केली.