
छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरसेची भारतीय संघात निवड
नवी दिल्ली ः जपानची राजधानी टोकियो येथे १३ ते २१ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने १९ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारताच्या या संघात १४ पुरुष खेळाडूंचा समावेश आहे, तर ५ महिला खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे, जे सर्व एकूण १५ स्पर्धांमध्ये सहभागी होतील. यापैकी गुलवीर सिंग आणि पूजा हे दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणारे एकमेव खेळाडू आहेत. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या भारतीय संघात नीरज चोप्राचे नाव देखील समाविष्ट आहे. या भारतीय संघात छत्रपती संभाजीनगर येथील धावपटू तेजस शिरसे याचा समावेश आहे.
पुढील महिन्यात टोकियो येथे होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताच्या १९ सदस्यीय संघाचे नेतृत्व सध्याचा विश्वविजेता नीरज चोप्रा करेल. उदयोन्मुख धावपटू अनिमेश कुजूर हा या स्पर्धेत स्थान मिळवणारा पहिला भारतीय धावपटू आहे. दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्रा व्यतिरिक्त, सचिन यादव, यशवीर सिंग आणि रोहित यादव यांचा पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत समावेश आहे. गेल्या वेळीही चार भारतीयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता परंतु रोहित दुखापतीमुळे बाहेर पडला होता. या सर्वांव्यतिरिक्त, विनाश साबळे ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये, पारुल चौधरी ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये, गुलवीर सिंग ५००० मीटरमध्ये, प्रवीण चित्रावल तिहेरी उडी स्पर्धेत सहभागी होतील.
१९ भारतीय खेळाडूंचा सहभाग
पुरुष – नीरज चोप्रा, सचिन यादव, यशवीर सिंग आणि रोहित यादव (पुरुषांची भालाफेक), मुरली श्रीशंकर (पुरुषांची लांब उडी), गुलवीर सिंग (पुरुषांची ५००० मीटर आणि १०००० मीटर), प्रवीण चित्रावेल आणि अब्दुल्ला अबुबकर (पुरुषांची तिहेरी उडी), सर्वेश अनिल कुशारे (पुरुषांची उंच उडी), अनिमेश कुजूर (पुरुषांची २०० मीटर), तेजस शिरसे (पुरुषांची ११० मीटर स्टीपलचेस धाव), सर्विन सेबॅस्टियन (पुरुषांची २० किमी चालणे), राम बाबू आणि संदीप कुमार (पुरुषांची ३५ किमी चालणे).
महिला – पारुल चौधरी आणि अंकिता ध्यानी (महिला ३००० मीटर स्टीपलचेस), अन्नू राणी (महिला भालाफेक), प्रियंका गोस्वामी (महिला ३५ किमी चालणे), पूजा (महिला ८०० मीटर आणि १५०० मीटर).