
मुंबई ः राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या बँक ऑफ बडोदा-बीओबी मुंबई विभागीय आंतर कॅरम स्पर्धेमध्ये जाझीम मोहम्मद विजेता व प्रदीप सुरोशे उपविजेता ठरला.
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागातर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत जाझीमने डावाच्या मध्याला आघाडी घेणाऱ्या प्रदीप सुरोशेचे आव्हान १०-६ असे संपुष्टात आणले. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागाचे उपमहाव्यवस्थापक सुदीप कुमार यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
उपांत्य फेरीच्या सामन्यात जाझीम मोहम्मदने निखिल पिंपळकरचा तर प्रदीप सुरोशेने राजेश सिंगचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेमध्ये ३२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. प्रमुख पंचाचे कामकाज अविनाश महाडिक, सचिन शिंदे, लीलाधर चव्हाण आदींनी पाहिले. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ बडोदा, मुंबई विभागीय कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या क्रीडा गुणाचे विशेष कौतुक केले.