
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः विश्वजित राजपूत सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात नाथ ड्रीप संघाने डीएफसी श्रावणी संघावर ५६ धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात विश्वजित राजपूत याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
रुफीट क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. नाथ ड्रीप संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात पाच बाद १८३ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना डीएफसी श्रावणी संघ १८ षटकात १२७ धावांवर सर्वबाद झाला. नाथ ड्रीप संघाने ५६ धावांनी विजय नोंदवला. विश्वजित राजपूत याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

या सामन्यात विश्वजित राजपूत याने ५३ चेंडूत ८६ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. त्याचे शतक अवघ्या १४ धावांनी हुकले. त्याने आपल्या वादळी खेळीत सहा उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. सुरज जाधव याने ३१ चेंडूत ३६ धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व दोन चौकार मारले. अनिकेत काळे याने १२ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. त्याने तीन षटकार व एक चौकार मारला.
गोलंदाजीत विकास पवार याने १९ धावांत चार विकेट घेऊन आपली चमक दाखवली. प्रदीप याने १३ धावांत तीन बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तनवीर राजपूत याने २७ धावांत दोन गडी बाद केले.