
धाराशिव ः जिल्हा क्रीडा कार्यालय धाराशिव आणि धाराशिव जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजाभवानी स्टेडियम येथे जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भैरवनाथ हायस्कूल धारूरच्या १३ मुली व १२ मुले असे एकूण २५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा अनुक्रमे ईपी, फॉईल व सेबर या तीन प्रकारामध्ये खेळवल्या गेल्या. यामध्ये हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत ३२ पदके पटकावत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी हरनाळे, तालुका क्रीडा अधिकारी नाईकवाडी, बिराजदार, क्रीडा मार्गदर्शक रोकडे, तसेच जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, अध्यक्ष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त श्रीधर सोमवंशी व विश्वजीत कुलकर्णी यांनी केले. सदर यशस्वी खेळाडूंचे संस्थापक सचिव दत्ता बंडगर, अध्यक्ष दिनेश बंडगर, कोषाध्यक्ष अशोक देवकते, मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले. या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख कुलकर्णी यांनी प्रशिक्षण दिले असून देवकते यांनी मार्गदर्शन केले आहे.