
सासवड ः राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने संजीवनी एज्युकेशनल, कल्चरल अँड स्पोर्ट्स रिसर्च फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्य क्रीडा रत्न पुरस्कार मिस्टर युनिव्हर्स संकेत काळे यास प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह, भारतीय राज्यघटनेची प्रत, फुले पगडी व उपरणे देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
सत्कार प्रसंगी आभार व्यक्त करताना संकेत काळे याने, “खेळ हीच माझी जात आहे व भारतीय संविधान हाच माझा धर्म आहे. व्यवस्थेत असलेली माझी जात शोधण्याचा कोणी प्रयत्नही करू नका. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मिळालेला पुरस्कार ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. माझ्या आयुष्यातील संघर्षाच्या काळात भीम गीतांनी मला लढण्याची प्रेरणा दिली. भारतातील प्रत्येक व्यक्ती ही बाबासाहेबांची ऋणी आहे.” असे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे साईनाथ बाबर यांनी बोलताना, “जगभरातील क्रीडा क्षेत्रात पूर्वीपासून असलेले मराठी सत्ता संकेत काळे यांनी अधिक बलशाली केली. तसेच प्रत्येक व्यक्तीने रोज एक तास स्वतःच्या शरीरासाठी देण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे.” असे मार्गदर्शन केले.
मूळचा सांगोला, सोलापूर येथील रहिवासी व सध्या वाघिरे महाविद्यालय, सासवड येथे प्रथम वर्ष एमए राज्यशास्त्राचा विद्यार्थी असलेला संकेत काळे याचे कोंढवा बुद्रुक येथे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवर्षाव करीत त्याचे स्वागत केले. या प्रसंगी मेधा टिळेकर, गणेश कामठे, हभप सुनील कामठे, नगरसेविका रंजना टिळेकर, वृषाली कामठे, दिलीप टिळेकर, सीमा टिळेकर, दीपाली धांडेकर आदी मान्यवर व कोंढवा बुद्रुक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप यांनी केले. सूत्रसंचालन समिधा जगताप यांनी केले तर फाउंडेशनच्या सचिव अर्चना जगताप यांनी आभार मानले.