
सोलापूर ः हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. खेळ ही संकल्पना शारीरिक विकासाबरोबर संतुलित मनाचाही पुरस्कार करते. मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळून मैदानी खेळांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करणे हेच आजचा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुहास छंचुरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक योगेश राऊत हे होते. पर्यवेक्षक नीता तमशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे व क्रीडा साहित्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचा परिचय करिश्मा चाकोते यांनी करून दिला.
प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतात क्रीडादिनाचे महत्त्व विशद करत खेळामुळे आत्मविश्वास वाढतो व योग्य मेहनतीने खेळ ही करिअर निवडीची प्रमुखता असू शकते असे सांगितले. याप्रसंगी आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून राहुल मुनाळे यांचा सत्कार करण्यात आला.
शलाका मठ हिने आपल्या भाषणातून राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व सांगितले. विजया बिराजदार यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी महाजन, सदस्य विजयालक्ष्मी नष्टे व निलावती खरात, श्रुती कुलकर्णी तसेच क्रीडा शिक्षक राहुल मुनाळे व कला शिक्षक सहदेव भालेकर यांनी परिश्रम घेतले.