
शारजाह ः संयुक्त अरब अमिराती, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघांमधील सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी खेळवण्यात आला. शारजाह येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने रशीद खानच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर यूएईचा ३८ धावांनी पराभव केला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाने २० षटकांत चार गडी बाद १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, यूएई संघ निर्धारित षटकांत आठ गडी बाद करून केवळ १५० धावाच करू शकला.
रशीद खानने रचला इतिहास
या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खान याने शानदार गोलंदाजी केली आणि तीन गडी बाद करून इतिहास रचला. तो टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. त्याने न्यूझीलंडच्या टिम साउथी याला मागे टाकले. त्याने १६४ गडी बाद केले आहेत. आता रशीदकडे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १६५ गडी बाद झाले आहेत. ईश सोधी तिसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेशचा शकिब-अल-हसन आणि मुस्तफिजूर रहमान अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
राशिद खान – १६५
टिम साउदी – १६४
ईश सोधी – १५०
शाकिब अल हसन – १४९
मुस्तफिजूर रहमान – १४२