
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः निलेश गवई, स्वप्नील चव्हाण सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात यंग ११ संघाने रायझिंग स्टार संघाचा ७० धावांनी पराभव करत आगेकूच कायम ठेवली. दुसरा सामना एमजीएम क्रिकेट अकादमी व डीएफसी श्रावणी यांच्यात झाला. अतिशय अटीतटीच्या लढतीत डीएफसी श्रावणी संघाने एक गडी राखून सामना जिंकला. या सामन्यांमध्ये स्वप्नील चव्हाण आणि निलेश गवई यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. एमजीएम क्रिकेट अकादमी आणि डीएफसी श्रावणी यांच्यातील सामना रोमहर्षक ठरला. एमजीएम क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात सर्वबाद १३६ धावा काढल्या. डीएफसी श्रावणी संघाने १७.२ षटकात नऊ बाद १३७ धावा फटकावत एक गडी राखून रोमांचक सामना जिंकला.
या सामन्यात अक्षय बनकर याने २४ चेंडूत ४७ धावा फटकावल्या. त्याने सात चौकार व एक षटकार मारला. सारंग मुंढे याने २९ चेंडूत ३८ धावा काढल्या. त्याने सात चौकार मारले. आसिफ खान याने १९ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. त्याने त्यात चार चौकार मारले.
गोलंदाजीत अमान शेख याने १२ धावांत तीन विकेट घेतल्या. अक्षय बनकर याने १८ धावांत तीन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली. आदित्य सुरडकर याने २६ धावांत तीन गडी टिपले. निलेश गवई याने सामनावीर पुरस्कार पटकावला.
स्वप्नील चव्हाणची दमदार फलंदाजी
यंग ११ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात सात बाद १५७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना रायझिंग स्टार संघ १८.३ षटकात ८६ धावांत सर्वबाद झाला. यंग ११ संघाने ७० धावांनी दणदणीत विजय नोंदवला.

सामनावीर ठरलेल्या स्वप्नील चव्हाण याने ३१ चेंडूत ५४ धावांची दमदार खेळी केली. त्याने सात चौकार व दोन षटकार मारले. चेतन मुंढे याने अवघ्या १३ चेंडूत २६ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने तीन उत्तुंग षटकार ठोकले. गौरव लोखंडे याने तीन चौकार व एक षटकार ठोकत २६ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत नकूल हजारी याने घातक गोलंदाजी करत ४ धावांत तीन बळी घेऊन सामना गाजवला. अभिषेक करडे याने ३१ धावांत तीन गडी बाद केले. संदीप सहानी याने ९ धावांत दोन गडी टिपले.