
पुणे ः भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांच्या पुढाकाराने व्यावसायिक व हौशी गोल्फपटूंसह विविध क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असलेल्या ट्रिनिटी गोल्फ चॅम्पियन्स लीग या आगळ्यावेगळ्या सांघिक गोल्फ स्पर्धेत वेव्ह रायडर्स, दक्षिण रेंजर्स, गोल्फ कोड या संघांनी पहिल्या दिवशी वेगवेगळ्या शैलीत प्रतिस्पर्धी संघाना नमवत विजयी सलामी दिली. चंदीगढ टायटन्स संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली.
पुण्यातील लवळे येथील ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत वेव्ह रायडर्स संघाने मुंबई वॉरियर्स संघाचा १०-६ असा पराभव केला. वेव्ह रायडर्स संघाच्या सुखमान सिंगने १७ व्या होलचे लक्ष्य केवळ एका फटक्यात साधून होल इन वन साधून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या सामन्यात दक्षिण रेंजर्स संघाने मराठा मुल्लीगंन्स संघाचा १० विरुद्ध ६ अशा फरकाने पराभव केला. दक्षिण रेंजर्स संघाच्या महिला व्यावसायिक खेळाडू वाणी कपूर आणि नेहा त्रिपाठी यांनी रोमांचकारी विजयाची नोंद करताना संघाला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला.
विश्वसमुद्रा गोल्डन ईगल्स संघाच्या व्यावसायिक खेळाडूंनी सलग तीन गुण मिळवताना जोरदार सुरुवात केली. मात्र, गोल्फ कोड संघाच्या हौशी खेळाडूंनी अनपेक्षित रित्या चमकदार कामगिरी करताना आपल्या संघाला १३-०३ असा विजय मिळवून दिला. चंदीगड टायटन्स संघाने दुगस्त्य टायटन्स-दुबई संघाचा १५-०६ असा धुव्वा उडवला.