नंदुरबार येथे राज्य-राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

  • By admin
  • September 3, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

हॉकी स्पर्धेत प्राविण्य शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला दुहेरी मुकुट

नंदुरबार (मयूर ठाकरे) ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व जिल्हा हॉकी असोसिएशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा संकुल येथे मेजर ध्यानचंद हॉकी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

सेवानिवृत्त क्रीडा संचालक ईश्वर धामणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, क्रीडा अधिकारी ओमकार जाधव, संजय बेलोरकर, क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार, महेंद्र काटे, जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव खुशाल शर्मा, राष्ट्रीय खेळाडू कुणाल भट, उमेश राजपूत, प्रकाश मिस्तरी, योगेश कुंभार, दीपमाला गावीत, एजाज खाटीक हे उपस्थित होते.

मेजर ध्यानचंद हॉकी चषक स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम प्राविण्य शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार (सिनियर बॉईज), द्वितीय एस ए मिशन हायस्कूल, नंदुरबार, तृतीय शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार (ज्युनियर बॉईज) यांनी शानदार यश संपादन केले. मुलींच्या गटात प्रथम प्राविण्य शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार, द्वितीय श्रीमती पुतळाबाई गजमल पाटील विद्यालय, वैंदाणे, तृतीय एस ए मिशन हायस्कूल नंदुरबार या शाळांनी घवघवीत यश संपादन केले.

उद्घाटन प्रसंगी सेवानिवृत्त क्रीडा संचालक ईश्वर धामणे यांनी खेळाडूंना क्रीडा विषयक मार्गदर्शन केले व खेळाडुंना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व उपस्थितांना व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे जिल्ह्यातील ७७ राज्य पातळीवर प्राविण्य प्राप्त खेळाडू, ३८ राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडू आणि तीन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडू तसेच खेलो इंडिया व ऑल इंडिया युनिव्हरसिटी दोन असे एकूण १२० प्राविण्य प्राप्त व सहभागी झालेल्या खेळाडूं विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरवण्यात आले. तसेच सन २०२२-२३ या वर्षात शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या सात शाळांना व सन २०२३-२४ या वर्षात शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या सहा शाळांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरवण्यात आले. यावेळी सर्व उपस्थित खेळाडू, क्रीडा शिक्षक, पालक, प्रमुख पाहुणे यांनी खेळ व तंदुरुस्ती बाबत शपथ घेतली.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन शिवछत्रपती पुरस्कारार्थी बळवंत निकुंभ, प्राचार्या सुषमा शहा (श्रॉफ हायस्कूल) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रदीप पवार, उपप्राचार्य मोहन अहिरराव (डी आर हायस्कूल), तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, तालुका क्रीडा संयोजक मीनल वळवी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओमकार जाधव यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पाटील यांनी केले. संजय बेलोरकर यांनी आभार मानले.

राष्ट्रीय क्रीडा दिन यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे, भगवान पवार, ओमकार जाधव, संजय बेलोरकर, मुकेश बारी, महेंद्र काटे, कल्पेश बोरसे, दिगंबर चौधरी आणि सर्व क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *