
मलकापूर ः जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, तालुका क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा संयोजक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स संघाने विजेतेपद पटकावले.
तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या १७ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल संघाने बाजी मारली. स्पर्धेमध्ये मलकापूर तालुक्यातील विविध शाळा सहभागी झाल्या होत्या. अंतिम सामना स्कूल ऑफ स्कॉलर्स विरुद्ध एम एस एम स्कूल यांच्या दरम्यान खेळला गेला. या अंतिम सामन्यामध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स संघाने २-० असा विजय साकारत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यांमध्ये पहिल्या पाच मिनिटात प्रतीक तायडे याने उत्कृष्ट गोल करुन आपल्या संघाचे खाते उघडले. तर शेवटच्या क्षणी यश अवटे याने अप्रतिम गोल केला. या संपूर्ण सामन्यांमध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचा गोलकीपर मोहित खारपे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या १७ वर्षाखालील मुलांच्या संघामध्ये अनुज कोळी (कर्णधार), प्रतीक तायडे, कृष्णा जावरे, मोहित खारपे, अजिंक्य कंडारकर, अभिनव शेलकर, प्रज्वल इंगळे, हर्ष राजपूत, प्रथमेश एकडे, यश अवटे, मोहम्मद झकी, स्मित वाघोदे, अनुज चव्हाण, राजवीर शेखावत, प्रशिक ताजने, सार्थक माळी या खेळाडूंचा समावेश आहे.या खेळाडूंनी जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले.
या विजयी संघातील खेळाडूंना स्कूल ऑफ स्कॉलर्सचे क्रीडा विभाग प्रमुख स्वप्नील साळुंके, क्रीडा शिक्षक मनीष उमाळे, विनायक सुरडकर, क्रीडा शिक्षिका मानसी पांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. विजयी संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल शाळेचे संचालक अमरकुमार संचेती, मुख्याध्यापिका डॉ. सुदीप्ता सरकार व शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.