
अव्वल मानांकित जयप्रकाशवर सहज मात
छत्रपती संभाजीनगर ः अखिल भारतीय आयटा प्रो सर्किट टेनिस स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा स्टार टेनिसपटू प्रणव कोरडे याने अग्रमानांकित जयप्रकाश उज्स तेजू याचा ६-४, ७-५ असा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्रणवच्या या सनसनाटी विजयाने सर्वांचे लक्ष त्याच्या कामगिरीकडे लागले आहे.
तामिळनाडूतील कोईमतूर येथे होत असलेल्या अखिल भारतीय आयटा प्रो सर्किट टेनिस स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा प्रतिभावान खेळाडू प्रणव कोरडे याने जयप्रकाश उज्स तेजू याचा ६-४ व ७-५ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच स्पर्धेमध्ये उच्च दर्जाचा खेळ करून सनसनाटी निर्माण केली आहे.
स्पर्धेच्या आयटा प्रो सर्किटमध्ये प्रणव याने क्वालिफायर स्पर्धेमध्ये सलग तीन विजय प्राप्त केले. मरीन लँड याचा सरळ सेटमध्ये ६-१, ६-० असा पराभव करून दुसऱ्या राउंड मध्ये निर्जेश्वर राव याचा ६-२, ६-२ असा पराभव केला. तसेच स्पर्धेच्या अंतिम क्वालिफाय मॅचमध्ये राम रातेनम याचा ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून स्पर्धेच्या मेन ड्रॉच्या मुख्य स्पर्धेमध्ये प्रवेश केला.
तसेच प्रणवने स्पर्धेच्या मेन ड्रॉ मध्ये प्रथम राऊंडमध्ये अव्वल मानांकित एचडी अखिलेश याचा ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या फेरीत केरळचा अव्वल मानांकित खेळाडू अर्जुन याचा अटीतटीच्या सामन्यात ६-७, ६-४ ७-६ असा पराभव करून उपांत्यपूर्व गाठली. अव्वल मानांकित जयप्रकाश उज्स तेजू याचा ६-४ व ७-५ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
अशाप्रकारे मुख्य फेरीत सलग तीन सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून प्रणव कोरडे याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याचा पुढील सामना अव्वल मानांकित खेळाडू तामिळनाडूचा तरुण विक्रम याच्याबरोबर गुरवारी कोईमतूर येथे होणार आहे.
प्रणव कोरडे हा एक प्रतिभावान खेळाडू असून त्याला प्रशिक्षक गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. चालू वर्षी प्रणव कोरडे यांनी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल जिंकले आहे. तसेच सध्या प्रणव कोरडे हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्यादृष्टीने तयारी करण्याच्या हेतूने हैदराबाद येथील सुरेश कृष्णा टेनिस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.
या शानदार कामगिरीबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी व देवगिरी प्रांतचे अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड श्रीकांत अदवंत व सीनियर कौन्सिल संजीव देशपांडे, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील ॲड अमरजीत गिरासे यांनी प्रणव ज्ञानेश्वर कोरडे याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.