
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः रमेश साळुंके, शेख सामी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये राऊडी सुपर किंग आणि झैनब सहारा क्रिकेट क्लब या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच केली आहे. या लढतींमध्ये रमेश साळुंके आणि शेख सामी यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला.
रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात राऊडी सुपर किंग संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सर्वबाद १६५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इलेव्हनने १६.३ षटकात सर्वबाद ११२ धावा काढल्या. राऊडी सुपर किंग संघाने ५३ धावांनी सामना जिंकला. या लढतीत रमेश साळुंके हा सामनावीर ठरला.

या सामन्यात रमेश साळुंके याने ३६ चेंडूत ५६ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने या आक्रमक खेळीत सहा षटकार व दोन चौकार ठोकले. बाळू हिवाळे याने पाच चौकारांसह ४३ धावा फटकावल्या. सय्यद नदीम याने चार चौकार व एक षटकार मारत ३१ धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत निनाद खोचे याने २९ धावांच चार विकेट घेतल्या. लहू लोहार याने १९ धावांत तीन गडी बाद केले. युनूस पठाण याने ३० धावांत तीन बळी टिपले.
झैनब संघाचा धावांचा पाऊस
दुसऱया सामन्यात झैनब सहारा क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात चार बाद २०२ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. एमई क्रिकेट अकादमीसमोर विजयासाठी २०३ धावांचे आव्हान होते. मात्र, धावांचा पाठलाग करताना एमई अकादमीचा डाव १९ षटकात ११६ धावांत संपुष्टात आला.
या सामन्यात फैझान अहमद याने ४२ चेंडूंचा सामना करत ६६ धावांची दमदार खेळी केली. त्याने तीन षटकार व सात चौकार मारले. अझीम कासिम सय्यद याने २५ चेंडूत ४४ धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार व तीन षटकार मारले. हर्ष किर्तीकर याने २७ चेंडूंत ४१ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार व एक षटकार मारला.
गोलंदाजीत शेख सामी याने ११ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. या कामगिरीमुळे सामी हा सामनावीर ठरला. अमोल दौड याने १० धावांत तीन गडी बाद केले. प्रज्वल अंधारे याने ३७ धावांत दोन बळी घेतले.