
पुणे ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघीरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओतूर येथे शैक्षणिक संशोधन समितीच्या वतीने महाविद्यालयीन स्तरावरील ‘अविष्कार स्पर्धा कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संजय रहांगडाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “अविष्कार सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्तीचा विकास होतो. नवनवीन कल्पना उदयास येतात, विद्यार्थ्यांमधील तर्कशुद्ध विचारसरणीला चालना मिळते तसेच विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. चांगले संशोधन हे नेहमीच राष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे ठरते. म्हणून विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे केवळ प्रकल्प म्हणून न पाहता करिअरचे महत्त्वाचे साधन म्हणून पाहिले पाहिजे.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र अवघडे यांनी आपल्या मनोगतामध्ये संशोधनाचे महत्त्व विविध उदाहरणांद्वारे अधोरेखित केले. जर आपल्या देशाला विकसित राष्ट्रीय करावयाचे असेल तर संशोधनाचे योगदान हे महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या देशामध्ये संशोधनाची संस्कृती जरी कमी असली तरी आपल्या पूर्वजांनी चांगल्या प्रकारे संशोधन केले आहे. याविषयी सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेत संशोधनाची गरज, पद्धती आणि ‘अविष्कार’ स्पर्धेत सहभागासाठी आवश्यक दिशा याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विनायक कुंडलिक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ साधू कोळेकर यांनी केले.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील विविध विभागांतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र अवघडे, उपप्राचार्य प्रा रमेश शिरसाट, प्रमुख पाहुणे डॉ संजय रहांगडाले, पदार्थ विज्ञान शास्त्र विभाग प्रमुख डॉ शिवाजी भुजबळ, शैक्षणिक संशोधन समितीचे समन्वयक डॉ साधू कोळेकर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ सुधीर बोराटे, डॉ हरिभाऊ बोराटे, डॉ पवन हांडे, डॉ अविनाश रोकडे, मराठी विभाग प्रमुख प्रा सुवर्णा डुंबरे, मराठी विभाग प्रमुख डॉ वसंतराव गावडे, हिंदी विभाग प्रमुख डॉ राजेंद्र रसाळ, डॉ किशोर काळदंते आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेमुळे संस्था पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयीची उत्सुकता वाढविण्यासाठी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या विधायक उपक्रमाचे स्वागत केले.