
निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांचे आश्वासन
येवला ः समता प्रतिष्ठान ही संस्था गेल्या पंचवीस वर्षांपासून चालवत असलेल्या मायबोली निवासी कर्ण बधिर विद्यालयातील आणि बहुउद्देशीय दिव्यांग निवासी कार्यशाळेतील मुलांना शिक्षण- प्रशिक्षण देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत विशेष प्रयत्न केले जाईल, असे स्पष्ट आश्वासन नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन तथा निमा या औद्योगिक क्षेत्रातील नामवंत उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष आशिष नहार यांनी येथे दिले.
समाजातील दिव्यांग मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षमपणे त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेने सुरू केलेल्या बहुउद्देशीय दिव्यांग निवासी संमिश्र कार्यशाळेचे उद्घाटन करताना आशिष नहार हे बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमाचे उपाध्यक्ष आणि येवल्याचे भूमिपुत्र, प्रसिद्ध उद्योजक किशोर राठी हे होते.
सुरुवातीला आशिष नहार यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते बहुउद्देशीय दिव्यांग निवासी संमिश्र कार्यशाळेच्या पैठणी विणकाम, संगणक, शिवणकाम, खादी निर्मिती आणि फेब्रिकेशन या व्यवसायिक प्रशिक्षण विभागाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बोलताना नहार म्हणाले की, मूकबधिर असूनही या मुलांनी आमच्या समोर जो सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला, ते पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. हे निखळ मानवतावादी काम आहे. संस्था आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमाला मी या निमित्ताने साष्टांग नमस्कार करतो. या कामाच्या पाठीमागे उभे राहणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास बसवलेल्या दिव्यांग सांस्कृतिक कलाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाला निमाच्या सर्व उद्योजकांतर्फे आवश्यक ते अर्थसाह्य करण्याबरोबरच या मुलांच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी स्वतंत्र कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी निमातर्फे हातभार लावला जाईल. निमाचे १६ हजारांपेक्षा जास्त उद्योजक प्रतिनिधित्व करतात. चार मेगा प्रोजेक्ट नाशिकमध्ये लवकरच सुरू होत आहेत. या उद्योजकांकडून मायबोलीतील विशेष मुलांच्या पुनर्वसनासाठी सीएसआर फंडातून देखील निधी मिळवून देण्यासाठी मी व्यक्तीश: प्रयत्न करीन, असेही त्यांनी यावेळी आश्वासित केले.
निफाड येथील न्यायमूर्ती रानडे शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्राचार्य व्ही डी व्यवहारे यावेळी मूकबधिर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहून आनंदित झाले. ते म्हणाले की, आयुष्यात उभे राहण्यासाठी धडपडत असलेल्या या दिव्यांग मुलांचा आपण आधार झाले पाहिजे. तब्बल पंचवीस वर्षे अशा प्रकारचे काम करीत राहणे ही दिसते तेवढी सोपी गोष्ट नाही आणि म्हणून निफाडकरांच्या वतीने या मुलांच्या अपंग सांस्कृतिक कलाविष्काराचे किमान तीन कार्यक्रम निफाड तालुक्यात होतील, असे तर आपण पाहणार आहोत. परंतु त्याचबरोबर या शाळेसाठी एक हात मदतीचा हा जो लोकसहभाग घेणारा उपक्रम आहे त्यातही आमची संस्था मागे राहणार नाही.
कार्यक्रमाच्या अध्यक्षानावरून बोलताना किशोर राठी म्हणाले, मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालय हे आम्हा येवलेकरांचे भूषण आहे. मूकबधिर असले तरी ही देखील मानसेच आहेत आणि म्हणून निखळ मानवतावादी दृष्टिकोनातून या शाळेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण या शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी २५ वर्षाचा अहवाल सादर करून केवळ लोकाश्रयावर हा दिव्यांग पुनर्वसन प्रकल्प कसा सुरू आहे? हे कथन केले.
या दिव्यांग कार्यशाळा उद्घाटन समारंभास निमाचे ट्रेझरर राजेंद्र अहिरे, खजिनदार राजेंद्र वडनेरे, ज्येष्ठ संचालक गोविंदराव बोरसे, चंदन जैन तसेच निफाड येथील विश्वासराव प्रल्हादराव कराड, मधुकर राऊत आणि येवल्याचे उद्योजक सुशील भाई गुजराती व्यासपीठावर उपस्थित होते.
बहुउद्देशीय दिव्यांग निवासी संमिश्र कार्यशाळेचे व्यवस्थापक सुजित बारे, कुणाल चव्हाण, कुणाल कोकाटे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. बाबासाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले तर सरचिटणीस दिनकर दाणे यांनी आभार मानले.