
छत्रपती संभाजीनगर ः पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत वैजापूर तालुक्यातील धावपटू अमृता गायकवाड हिने सुवर्णपदक पटकावले.
वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव येथील जयहिंद विद्यालयाची धावपटू अमृता सुकदेव गायकवाड हिने सुवर्णपदक जिंकून आपला दबदबा कायम ठेवला. अमृता ही एस बी काॅलेज, छत्रपती संभाजीनगर येथे बीएस्सी द्वितीय वर्षात शिकत आहे.
शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठगट मैदानी स्पर्धेत २० वर्षांखालील मुलींच्या गटात १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ऐश्वर्या हिंगे पुणे (४: ५३.४८) रौप्यपदक व श्रेया पाटील कोल्हापूर (४:५६.५३) कांस्यपदक यांच्यावर चुरशीच्या शर्यतीत मात करत अमृता गायकवाड हिने (४:४९.२४) आपली सर्वोत्तम वेळ देऊन सुवर्णपदक पटकावले.
शेतकरी कन्या अमृताच्या विशेष सुवर्णमयी कामगिरीबद्दल जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव डॉ फुलचंद सलामपुरे, पंकज भारसाखळे, डॉ दयानंद कांबळे, सतीश पाटील, तुषार खेडकर आदींनी अभिनंदन केले आहे.