
नवी दिल्ली ः यूएस ओपन स्पर्धेत २४ वर्षीय इटालियन टेनिसपटू यानिक सिनर याने क्वार्टर फायनल सामन्यात आपली विजयी मोहीम सुरू ठेवली आणि उपांत्य फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले.
यानिक सिनरचा सामना क्वार्टर फायनल सामन्यात लोरेन्झो मुसेट्टीशी झाला आणि त्याने तिन्ही सेट जिंकले. सिनर याने आतापर्यंतच्या उपांत्य फेरीच्या प्रवासात फक्त एकच सेट गमावला आहे.
यानिक सिनरने क्वार्टर फायनल सामन्याचा पहिला सेट लोरेन्झो मुसेट्टीविरुद्ध एकतर्फी ६-१ ने जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्ये दोघांमध्ये काही उत्साह दिसून आला. परंतु सिनरने तोही ६-४ ने जिंकला. त्याच वेळी, यानिक सिनरने तिसरा आणि शेवटचा सेट एकतर्फी ६-२ ने जिंकला आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात आपले स्थान निश्चित केले. यासह, सिनरने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच एका वर्षात झालेल्या सर्व ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सिनर याने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले होते, परंतु फ्रेंच ओपनमध्ये त्याला कार्लोस अल्काराझविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. सिनरने विम्बल्डनमध्ये अल्काराझचा पराभव करून त्याचा बदला घेतला.
ग्रँड स्लॅम इतिहासातील ३७ वर्षांचा विक्रम मोडला
इटालियन खेळाडू यानिक सिनरने २०२५च्या यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचून काही नवीन विक्रमही केले. यानिक सिनर आता ग्रँड स्लॅम इतिहासातील २४ वर्षे आणि १८ दिवसांच्या वयात एकाच हंगामात विक्रमी २५ सामने जिंकणारा पहिला खेळाडू बनला आहे. या बाबतीत सिनर याने मॅट्स विलँडरचा विक्रम मोडला. सिनर एका हंगामात सर्व ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा ओपन युगातील दुसरा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. या यादीत राफेल नदाल अव्वल स्थानावर आहे, ज्याने वयाच्या २२ व्या वर्षी ही कामगिरी केली.