
जळगाव ः क्रीडा क्षेत्रात जैन इरिगेशनच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी भारतीय संघात जैन इरिगेशनच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा २ ते ६ डिसेंबर दरम्यान मालदीव येथे होणार आहे.

या स्पर्धेत जैन इरिगेशनचे खेळाडू संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर, झैद फारुकी हे भारतीय संघातून खेळणार आहे. ही निवड आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथे फेडरेशन कप या स्पर्धेत व दिल्ली येथे जानेवारी महिन्यात झालेल्या राष्ट्रीय कॅरम अंजिक्यपद स्पर्धेतील कामगिरीवरुन करण्यात आली आहे. ज्यात जैन इरिगेशन कंपनीचे दोन्ही महिला आणि पुरुष संघ हे अंतिम विजेता ठरले होते.

तिघेही कॅरमपटू हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, युरोपियन संघ, अमेरिका, ब्रिटन, स्वित्झर्लंड यासह जगातील प्रमुख देशातील संघ सहभागी होणार आहेत. या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन यांच्यासह सहकाऱ्यांनी कौतुक केले आहे.