
छत्रपती संभाजीनगर ः चेन्नई (तामिळनाडू) येथे नुकत्याच झालेल्या चिल्ड्रन कॅडेट राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत आदित्य राज , गौरव रासकर यांनी सुवर्णपदक तर चैतन्य इंगळे व आदित्य राज यांनी कांस्य पदक पटकावले. विजयी खेळाडूंची आगामी आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
चेन्नई येथे झालेल्या चिल्ड्रन व कॅडेट राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आदित्यराज याने वयोगट ७ ते ९ वर्ष वयोगटात -३३ किलो आतील वजन गटात प्रथम फेरित लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात उत्तर प्रदेश व उपांत्यपूर्व फेरीत ओडिशा सोबत खेळताना ३-० असा सहज विजय संपादन केला. उपांत्य फेरीत तामिळनाडूच्या खेळाडूला ३-० तर अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मुंबईच्या खेळाडूला ३-१ ने पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले. तसेच पाँईट फाईट प्रकारात दोन फेऱ्या पार करून कांस्यपदक पटकाविले.
१० ते १२ वयोगटात -३७ किलो आतील वजन गटात लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात गौरव रासकर याने प्रथम फेरीत आंध्र प्रदेशच्या खेळाडूला ३-०, तामिळनाडूच्या खेळाडूला २-१ व उपांत्य फेरीत हरियाणाच्या खेळाडूला २-१ अशा फरकाने पराभूत करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मुंबईच्या खेळाडूला ३-० ने पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. चैतन्य इंगळे याने दोन फेऱ्या पार करून कांस्यपदक पटकाविले. विजयी खेळाडूंना इंडियन आर्मीचे अनआर्म कॉम्बॅक्ट कोच सुरेश मिरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडूंचे इंडियन आर्मीचे कर्नल संदीप थापलियाल, परिवार कल्याण संस्थान इंडियन आर्मीचे संचालक परिधी थापलियाल, लेफ्टनंट कर्नल सुजित कुमार, किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटनेचे सचिव अनिल मिरकर, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, सोनामाता शाळेच्या संचालिका विमल तळेगावकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.