
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः मानव काटे, अनिल जाधव सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात नाथ ड्रीप संघाने एमजीएम क्रिकेट अकादमी संघावर नऊ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात डीएफसी श्रावणी संघाने टीम एक्सएल संघाचा पाच विकेट राखून पराभव केला. या लढतींमध्ये मानव काटे आणि अनिल जाधव यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या लढतीत एमजीएम क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय एमजीएम अकादमीला महागात पडला. एमजीएम अकादमी संघ अवघ्या १६ षटकात ८९ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर नाथ ड्रीप संघाने ७ षटकांच्या खेळात एक बाद ९१ धावा फटकावत नऊ विकेट राखून शानदार विजय साकारला. मानव काटे याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
या सामन्यात मानव काटे याने २६ चेंडूत ५० धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याने पाच चौकार व तीन षटकार मारले. सारंग मुंढे याने २८ धावा काढताना तीन चौकार व एक षटकार मारला. डॉ आर्यन याने २७ चेंडूत २७ धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार मारले.

गोलंदाजीत ऋषभ पवार याने १० धावांत तीन विकेट घेऊन आपला प्रभाव दाखवला. सुरज जाधव याने ११ धावांत दोन गडी बाद केले. देवरुथ खोसे याने १४ धावांत एक गडी बाद केला.
निलेश, अनिल, अविष्कारची प्रभावी गोलंदाजी
दुसऱ्या सामन्यात डीएफसी श्रावणी संघाने टीम एक्सएल संघावर पाच गडी राखून मोठा विजय साकारला. टीएम एक्सएल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात सर्वबाद १४८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मात्र, डीएफसी श्रावणी संघाने अवघ्या १५.३ षटकात शानदार फलंदाजी करत पाच बाद १४९ धावा फटकावत पाच विकेटने सामना जिंकला. अनिल जाधव याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
या सामन्यात अनिल जाधव याने २९ चेंडूत ५५ धावांची दमदार खेळी केली. त्याने सहा चौकार व तीन षटकार मारले. ओमकार बिरोटे याने २७ चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी केली. त्याने पाच उत्तुंग षटकार व एक चौकार मारला. अदनान अहमद याने ३१ चेंडूत ५० धावा काढल्या. त्याने चार टोलेजंग षटकार व दोन चौकार मारले.
गोलंदाजीत निलेश गवई याने प्रभावी मारा करत १२ धावांत दोन गडी बाद केले. अनिल जाधव याने २१ धावांत दोन बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी नोंदवली. अविष्कार नन्नावरे याने १५ धावांत दोन गडी बाद केले.