
छत्रपती संभाजीनगर ः राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये राज्यातील आणि जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यास विहित केलेल्या तरतुदीनुसार शासनाची मान्यता दिली आहे. या युवा पुरस्कारासाठी संबंधितांनी आपले प्रस्ताव विहीत नमुन्यात सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम १० हजार रुपये, प्रति संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम ५० हजार अशा स्वरूपाचा असेल.
सन २०२२-२०२३, २०२३-२०२४ व २०२४-२०२५ या तीन वर्षाकरीता जिल्हा युवा पुरस्कारासाठी पात्र युवक-युवती व युवा संस्था यांच्याकडून अर्जसहित प्रस्ताव मागविण्यात येत आहे. विहित नमुन्यातील मागणी अर्ज कार्यालयाकडुन वितरीत करण्यात येतील तर परीपूर्ण भरलेले प्रस्ताव दाखल करण्याची ८ सप्टेंबर २०२५ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत असेल. सदर तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी सांगितले आहे.