पुणे ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खराडी येथील शंकराव उरसळ कॉलेज ऑफ डिप्लोमा फार्मसी आणि एडीएमएलटी या अभ्यासक्रमाला शैक्षणिक वर्ष शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून उत्कृष्ट ही श्रेणी प्राप्त झाल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अश्विनी शेवाळे यांनी दिली.
महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या सोयीसुविधा, महाविद्यालयात घेतला जाणारा अभ्यासक्रम, परीक्षांचे निकाल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे उपक्रम, सामाजिक उपक्रमात महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांचा सहभाग, विविध स्पर्धांमधील सहभाग, देण्यात येणाऱ्या नोकरीच्या संधी याबाबतचे सखोल परीक्षण करून हा दर्जा महाविद्यालयाला प्राप्त झाल्याचे सांगितले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, अध्यक्ष प्रतिनिधी राजेंद्र घाडगे, सचिव ॲड संदीप कदम, खजिनदार ॲड मोहनराव देशमुख, सहसचिव ए एम जाधव यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अश्विनी शेवाळे आणि सर्व स्टाफचे अभिनंदन केले.
आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ अश्विनी शेवाळे यांनी सांगितले की, एमएसबीटीइकडून आमच्या महाविद्यालयाला ‘एक्सलंट’ श्रेणी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. हे यश प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेहनतीचे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे आणि संपूर्ण संस्थेच्या एकजुटीचे प्रतीक आहे. ही मान्यता आमच्या शैक्षणिक प्रवासाला नवे बळ देणारी आहे. भविष्यातही आमचे विद्यार्थी आणि शिक्षक मिळून असेच नवे यश संपादन करतील, असा मला दृढ विश्वास आहे.