उत्कंठवर्धक अंतिम सामन्यात प्रणव कोरडे उपविजेता

  • By admin
  • September 5, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आयटा एक लाख प्रो सर्किट पुरुष टेनिस स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा प्रतिभावान खेळाडू प्रणव कोरडे याने उपविजेतेपद पटकावले आहे.

या स्पर्धेत प्रणव कोरडे याने अव्वल मानांकित जयप्रकाश तेजू याचा ६-४, ७-५ असा सनसनाटी पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली होती. उपांत्य सामन्यापूर्वी प्रणव कोरडे याने एच डी अखिलेशचा ६-४, ६-२ असा पराभव केला तर दुसऱ्या फेरीत त्याने पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना केरळच्या अर्जुन याच्यावर ६-७, ६-४, ७-६ अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरीतही त्याने चुरशीच्या ठरलेल्या लढतीत जयप्रकाश तेजू याच्यावर मात करताना प्रणव कोरडे उपांत्य फेरीतील मार्ग सुकर केला.

उपांत्य फेरीत प्रणव कोरडे याचा सामना तामिळनाडूचा खेळाडू तरुण विक्रम याच्याबरोबर झाला. अतिशय उत्कंठावर्धक सामन्यांमध्ये सरळ सेटमध्ये प्रणव कोरडे याने तरुण विक्रम याच्यावर ६-३, ६-४ असा सहज विजय संपादन केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.

विजेतेपदासाठी झालेल्या अंतिम सामन्यात प्रणव कोरडेचा सामना तामिळनाडूचा अव्वल मानांकित खेळाडू मुथु आदित्य याच्याबरोबर झाला अडीच तास चाललेल्या लढतीत ५-७, ४-६ अशा फरकाने प्रणवला पराभव स्वीकारावा लागला. अतिशय उत्कंठावर्धक सामन्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ करूनही प्रणव कोरडे याचा पराभव झाला. प्रणव कोरडे याने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले.

पात्रता फेरीच्या सर्व मॅचेस जिंकून अंतिम सामन्यापर्यंत अपराजित राहून उपविजेत्या पदापर्यंत प्रणवने मजल मारली. या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रणव कोरडे याला प्रशिक्षक गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रणव कोरडे याने यावर्षी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. या यशाबद्दल छत्रपती संभाजीनगर मनपा प्रशासक जी श्रीकांत, ग्रामीण विभागाचे पोलीस आयुक्त डॉ विनय कुमार राठोड, मुंबईचे उद्योजक हिराबाई दोशी, कॅप्टन दोशी आदींनी प्रणव ज्ञानेश्वर कोरडे याचे अभिनंदन केले आहे आणि पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *