
मुंबई ः बाळ गोपाळ (अभिलाषा) गणेशोत्सव मंडळ-काळाचौकी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे पुरस्कृत राज्य स्तरीय गणाधीश चषक १८ वर्षांखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धेला शुक्रवारी शानदार सुरुवात झाली.
या स्पर्धेत डॉ अँटोनियो दासिल्वा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीचा भारत सावंत, न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, राष्ट्रीय ख्यातीची ज्युनियर कॅरमपटू सिमरन शिंदे आदींनी सलामीचे सामने जिंकले. प्रारंभापासून अचूक फटके साधत ध्रुव भालेरावने महिला मंडळ-कुर्ला शाळेच्या पियुष कांबळेचे आव्हान २५-० असे संपुष्टात आणून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा उदयोन्मुख ज्युनियर कॅरमपटू नील म्हात्रेने डावाच्या मध्याला सावंतवाडीच्या भारत सावंतला ६-६ अशा बरोबरीत रोखले होते. परंतु त्यानंतर उत्तम सूर सापडलेल्या भारत सावंतने १२-६ अशी बाजी मारली. अन्य सामन्यात जैतापूरच्या आर्यन राऊतने अर्णव शिंगटे याचा, सिमरन शिंदेने शिवांश मोरेचा, सार्थक केरकरने विराज बर्वेचा, कौस्तुभ जागुष्टे याने अर्णव गावडेचा, सारा देवनने सिद्धांत मोरेचा पराभव करून पहिल्या फेरीत विजय मिळविला.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे, लायन हुजेफा घडियाली, ज्येष्ठ पत्रकार नवनाथ दांडेकर, प्रमुख पंच अविनाश महाडिक, समाजसेवक दिलीप वरेकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आले.