
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः शतकवीर विश्वजित राजपूत, शेख अल्ताफ सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात लकी क्रिकेट क्लब संघाने अटीतटीच्या सामन्यात रायझिंग स्टार संघाचा दोन गडी राखून पराभव केला. दुसऱया सामन्यात नाथ ड्रीप संघाने महाराणा ११ संघाचा ४० धावांनी पराभव करत आगेकूच केली. या लढतींमध्ये शेख अल्ताफ आणि विश्वजित राजपूत यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. रायझिंग स्टार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात आठ बाद १४३ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना लकी क्रिकेट क्लबने आठ गडी गमावून १४४ धावा फटकावत दोन गडी राखून सामना जिंकला. गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करणाऱया शेख अल्ताफ याने सामनावीर पुरस्कार मिळवला.

या सामन्यात अक्षय गिरेवाड याने शानदार फलंदाजी केली. त्याने ४१ चेंडूत ५० धावांची दमदार खेळी साकारली. त्याने सहा चौकार व एक षटकार मारला. कुलदीप कांदे याने ३९ चेंडूत ३५ धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार मारले. अर्शद खान याने २९ चेंडूत ३२ धावा काढल्या. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला.
गोलंदाजीत शेख अल्ताफ याने २६ धावांत तीन विकेट घेऊन सामना गाजवला. शाहरुख शाह याने १६ धावांत दोन गडी बाद केले. कुलदीप कांदे याने २४ धावांत दोन बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली.
विश्वजित राजपूतचे स्फोटक शतक
नाथ ड्रीप आणि महाराणा ११ यांच्यातील सामना एकतर्फी झाला. याचे मुख्य कारण म्हणजे विश्वजित राजपूत याच्या धमाकेदार शतकामुळे नाथ ड्रीप संघाने १८ षटकात पाच बाद १७६ अशी भक्कम धावसंख्या उभारून सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना महाराणा ११ संघ १६.२ षटकात १३६ धावांवर सर्वबाद झाला.

या सामन्यात विश्वजित राजपूत याने अवघ्या ५६ चेंडूत १०३ धावांची वादळी शतकी खेळी साकारली. त्याने शतक ठोकताना १४ चौकार व तीन षटकार मारले. राहुल राजपूत याने २४ चेंडूत ४१ धावा फटकावल्या. त्याने तीन षटकार व दोन चौकार मारले. अनिकेत काळे याने २१ चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले. त्याने तीन उत्तुंग षटकार व दोन चौकार मारले.
गोलंदाजीत रवींद्र बोडखे याने २९ धावांत पाच विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. अनिकेत काळे याने २० धावांत दोन गडी बाद केले. योगेश पुंड याने ७ धावांत एक बळी मिळवला.