भारतीय अ संघाच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यर 

  • By admin
  • September 7, 2025
  • 0
  • 1 Views
Spread the love

ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

मुंबई ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय अ संघाची घोषणा करताना नेतृत्व स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. 

भारतीय अ संघ ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध दोन चार दिवसांचे सामने खेळेल. पहिला सामना १६ सप्टेंबरपासून खेळला जाईल तर दुसरा सामना २३ सप्टेंबरपासून सुरू होईल. दोन्ही सामने लखनौमध्ये सकाळी ९:३० वाजता खेळले जातील.

पहिला सामना संपल्यानंतर दुसऱ्या चार दिवसांच्या सामन्यापूर्वी केएल राहुल आणि मोहम्मद यांनाही भारतीय अ संघात समाविष्ट केले जाईल. दोघेही पूर्वी निवडलेल्या संघातील कोणत्याही दोन खेळाडूंच्या जागी संघाचा भाग असतील. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी निवडलेल्या संघात केएल आणि सिराज यांचा समावेश नाही.

श्रेयस अय्यरलाही आशिया कप संघात स्थान देण्यात आले नाही. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन चार दिवसांच्या मालिकेत उजव्या हाताचा फलंदाज भारतीय अ संघाचे नेतृत्व करताना दिसेल. श्रेयसला आशिया कप संघात वगळण्यात आल्यानंतर प्रश्न उपस्थित केले जात होते. चांगला फॉर्म असूनही तो संघात स्थान मिळवू शकला नाही. आयपीएल २०२५ मध्ये अय्यरने फलंदाजीने शानदार कामगिरी केली. त्याने १७ डावांमध्ये ६०४ धावा केल्या, त्याची सरासरी ५०.३३ आणि स्ट्राईक रेट १७५.०७ होता. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा अर्धशतके निघाली. डावावर नियंत्रण ठेवण्याची त्याची क्षमता देखील उत्कृष्ट होती, ज्याचा अंदाज ७९.१ टक्के नियंत्रण दरावरून लावता येतो.

तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 
दोन चार दिवसीय सामन्यांनंतर, कानपूरमध्ये भारतीय अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी तर दुसरा सामना ३ ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. त्याच वेळी, ५ ऑक्टोबर रोजी दोन्ही संघ मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी एकमेकांसमोर येतील. यासाठी बीसीसीआय स्वतंत्र संघ जाहीर करेल.

भारतीय अ संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, एन जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुश कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकूर.

भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना – १६ सप्टेंबर-१९ सप्टेंबर (लखनौ)
दुसरा सामना – २३ सप्टेंबर-२६ सप्टेंबर (लखनौ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *