
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर ः कागल येथे मंत्री हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने शिक्षक दिनानिमित उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ म्हणाले की, आज शिक्षण क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती घडत असून या क्रांतीमुळे ज्ञानप्राप्तीची नवी दारे उघडली आहेत. त्यामुळे शिक्षणाची प्रगती झपाट्याने होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यासारख्या आधुनिक साधनांमुळे शिक्षण अधिक सुलम, आकर्षक आणि परिणामकारक झाले आहे. शिक्षण क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाच्या आव्हानाचे रुपांतर संधीत कारण्याची गरज आहे. क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. इंग्रजी शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत होती. मात्र मी शिक्षणमंत्री असताना सुरू केलेल्या सेमी इंग्रजी विषयामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारच्या मानांकनामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रथम आला असून त्यात कागल तालुक्यानेही पहिला क्रमांक मिळवला आहे, ही अभिमानाची बाब आहे.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, शिक्षकांना सन्मानित करण्याचा मंत्री मुश्रीफ यांचा उपक्रम स्तुत्य आहे. हा उपक्रम कधीही खंडित झाला नाही. पवित्र पोर्टलमधीत त्रुटी दूर करून ते नव्याने सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. अकरावीचे प्रवेश पूर्वीप्रमाणे ऑफलाईन होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार माध्यमिक विभागालाही लागू करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोदे, गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीचे संचालक भैया माने, दादासाहेब लाड, वसंतराव पुरे, डॉ पाळी, बाळासाहेब तुरंबे, किरण पास्ते यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.