
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळाच्या मराठी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व शारीरिक शिक्षणातील पदवीधर महेंद्र कमलाकर पाटील यांना शैक्षणिक-क्रीडा कार्यार्थ आयडियल टीचर अवार्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
काळाचौकी येथील गणाधीश श्री मंडपात महेंद्र पाटील यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रुपये तीन हजार स्वरूपाचा पुरस्कार देऊन माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, लायन हुजेफा घडियाली, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौराविण्यात आले.
गेली अनेक वर्षे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सुरु असलेल्या शालेय क्रीडा चळवळीत महेंद्र पाटील हिरीरीने भाग घेतात. शालेय मुला-मुलींना अभ्यासाची आवड निर्माण करून देण्यासाठी ते सतत झटत असतात. त्याअनुषंगाने विविध उपक्रम राबवीत असतात. तसेच त्यांच्या आवडत्या खेळामध्ये तरबेज करण्यासाठी खेळातील प्राथमिक माहिती शालेय खेळाडूंना देत असतात. अशा सेवाभावी शिक्षकाचा सन्मान आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, बाळ गोपाळ गणेशोत्सव मंडळ व लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन आयोजित राज्य स्तरीय विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धे प्रसंगी राज्यातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.