
दक्षिण रेंजर्स संघ उपविजेता, गोल्फ कोड संघ तिसऱ्या क्रमांकावर
पुणे ः भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांच्या पुढाकाराने व्यावसायिक व हौशी गोल्फ पटूंसह विविध क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असलेल्या ट्रिनिटी गोल्फ चॅम्पियन्स लीग(टीजीसीएल) या स्पर्धेत अंतिम फेरीत अमनदीप द्राल व अभिनव लोहान यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर चंदीगड टायटन्स संघाने दक्षिण रेंजर्स संघाचा ११-५ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पुण्यातील लवळे येथील ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेत चंदीगड टायटन्स संघाने अंतिम फेरी निश्चित केली होती. परंतु शुक्रवारी उपांत्य फेरीचा सामना पूर्ण न झाल्याने शनिवारी सकाळी दक्षिण रेंजर्स संघाने वेव्ह रायडर्स संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत चंदीगड टायटन्स संघाने दक्षिण रेंजर्स संघावर ११-५ असा विजय मिळवला. तर, गोल्फ कोड संघाने वेव्ह रायडर्स संघाचा टायब्रेकरमध्ये पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व ३० लाख रुपये, तर उपविजेत्या दक्षिण रेंजर्स संघाला करंडक व १५ लाख रुपये आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या गोल्फ कोड संघाला करंडक व १० लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांच्या हस्ते करण्यात आले.