
हर्सूल कुस्तीची शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी भेट
छत्रपती संभाजीनगर ः महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मी आयुक्त होणार या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत दर शनिवारी मनपाच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी व आयुक्त यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी त्यांच्या जलश्री या निवासस्थानी भेट दिली जाते. या शनिवारी मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा हर्सूल (कुस्तीची शाळा) या शाळेतील विद्यार्थ्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी भेट दिली.
या शाळेतील मुलांनी सकाळी आल्याबरोबर कुस्त्यांसाठी असलेल्या कसरती / सराव केला. मुलींनी खो-खो आणि कबड्डी, रस्सीखेच हे खेळ खेळले आणि त्यानंतर सुरू झाल्या त्या म्हणजे कुस्त्या. लहान मुलांच्या, मोठ्या मुलांच्या एक एक अशा अनेक कुस्त्या या विद्यार्थ्यांनी तेथे सादर केल्या. विशेष म्हणजे सहजासहजी कोणाचीच पाठ लागत नव्हती म्हणजे कोणी कोणाला सहज हरवू शकत नव्हता. अनेक कुस्त्या झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्याच गावातून येत असलेले हर्सूल तलावातील पाणी कशा पद्धतीने निजामकालीन असलेली सर्वात जुनी आणि जमिनीत असलेली टाकीमध्ये पडताना दाखविले व त्या टाकीचे आणि पाण्याचे महत्व ज्ञानदेव सांगळे यांनी सांगितले.
त्यानंतर आयुक्त श्रीकांत यांच्या पत्नी सोनम श्रीकांत यांची भेट घेण्यासाठी विद्यार्थी गेले असता त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना निवासस्थानी बसविलेला गणपती आणि त्यासाठी केलेला देखावा सर्व विद्यार्थ्यांना दाखविला. शिक्षक दिन झाल्यामुळे सोबत आलेल्या सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना कॅडबरी / चॉकलेट दिले. एका मुलीने छान नटरंग गीत सादर केले.
आयुक्त आणि प्रशासक जी श्रीकांत यांनी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची त्या खेळामध्ये असलेली आवड ओळखून त्या शाळेला दिलेले विशेष नाव आणि त्या खेळासाठी दिलेले प्रोत्साहन व त्या खेळासाठी तेथील ग्राउंड विकसित करणे त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा आवड असलेल्या कलेमध्ये विकास होताना दिसत आहे. असेच मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा हर्सूल या शाळेतील विद्यार्थीची कुस्तीसाठी आवड होती म्हणून त्यांनी नामांकित मल्ल/ कुस्तीपटूंची नियुक्ती त्या ठिकाणी केली. त्यामुळे आज त्या शाळेतील विद्यार्थी चांगल्या कुस्त्या खेळत आहेत तसेच एक विद्यार्थी राज्य सरकारने आयोजित केलेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरापर्यंत त्याची निवड झाली होती.
या भेटीच्या वेळी उपायुक्त अंकुश पांढरे, नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांच्यासह जगन्नाथ सपकाळ (मुख्याध्यापक), अंकुश लाडके, सविता भांबर्डे, संगीता शहाणे, रामेश्वर वाडेकर, कला निदेशक सतीश उघडे व क्रीडा प्रशिक्षक हरिदास म्हस्के उपस्थित होते.