
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः देवरुथ खोसे, मोहम्मद सोमेल सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात नाथ ड्रीप संघाने व्हिजन क्रिकेट अकादमी संघावर ७२ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात लकी क्रिकेट क्लबने चुरशीच्या सामन्यात डीएफसी श्रावणी संघावर पाच विकेट राखून विजय नोंदवला. या लढतींमध्ये देवरुथ खोसे आणि मोहम्मद सोमेल यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात नाथ ड्रीप संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १८ षटकात आठ बाद १६१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना व्हिजन क्रिकेट अकादमीचा संघ १३.५ षटकात ८९ धावांत सर्वबाद झाला. नाथ ड्रीप संघाने ७२ धावांनी मोठा विजय संपादन केला.
या सामन्यात मानव काटे याने ४९ धावांची दमदार खेळी केली. त्याने सहा चौकार व एक षटकार मारला. विश्वजित राजपूत याने २४ धावांची सुरेख खेळी केली. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला. अनिकेत काळे याने १२ चेंडूत २३ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार मारले.
गोलंदाजीत देवरुथ खोसे याने घातक गोलंदाजी करत २० धावांत पाच विकेट घेऊन संघाला मोठा विजय मिळवून दिला. या शानदार कामगिरीमुळे खोसे याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सुरज जाधव याने १७ धावांत तीन गडी बाद केले. अजिंक्य पाथ्रीकर याने ३६ धावांत तीन गडी टिपले.
जुनेद पटेलची स्फोटक फलंदाजी
दुसरा सामना डीएफसी श्रावणी आणि लकी क्रिकेट क्लब यांच्यात झाला आणि हा सामन रोमांचक ठरला. डीएफसी श्रावणी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात आठ बाद १६८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. लकी क्रिकेट क्लब संघाने हे आव्हान स्वीकारले आणि १७.२ षटकात पाच बाद १७२ धावा फटकावत पाच विकेट राखून सामना जिंकला. मोहम्मद सोमेल याने आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला आणि त्यामुळे सोमेल सामनावीर ठरला.

या सामन्यात मोहम्मद सोमेल याने ४५ चेंडूत ५४ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने सहा चौकार मारले. जुनेद पटेल याने अवघ्या १९ चेंडूत ४९ धावांची स्फोटक खेळी केली. जुनेद आपल्या धमाकेदार खेळीत सात उत्तुंग षटकार ठोकले. परवेझ खान याने २९ धावा फटकावताना चार चौकार व एक षटकार मारला.
गोलंदाजीत मोहम्मद सोमेल याने १९ धावांत तीन विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली. तनवीर राजपूत याने २९ धावांत दोन गडी बाद केले. अहमद अल हमद याने ३२ धावांत दोन बळी घेतले.