
नवी दिल्ली येथे २७ सप्टेंबरपासून स्पर्धेला प्रारंभ
नवी दिल्ली ः नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर येत्या २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ सहभागी होणार आहे. यावेळी एकूण ३५ भारतीय खेळाडू प्रथमच जागतिक मंचावर पदार्पण करतील. भारतीय पॅरा क्रीडा इतिहासातील हा एक नवा अध्याय मानला जातो.
या नवीन खेळाडूंमध्ये भालाफेकपटू महेंद्र गुर्जरचे नाव सर्वात खास आहे. या वर्षी स्वित्झर्लंडमधील नॉटविल ग्रांप्रीमध्ये पुरुषांच्या एफ ४२ प्रकारात ६१.१७ मीटर भालाफेक करून गुर्जर याने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. सध्या पतियाळा येथे प्रशिक्षण घेत असलेला गुर्जर त्याच्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पदक जिंकून देण्यासाठी सज्ज आहे.
गुर्जर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ही अजिंक्यपद स्पर्धा केवळ पदकांबद्दल नाही, तर ती भारतीय पॅरा अॅथलीट्सच्या आवडीची आणि क्षमतेची जगाला ओळख करून देण्याबद्दल आहे. त्याला आशा आहे की आमच्या कामगिरीमुळे अधिकाधिक तरुणांना, विशेषतः मुलींना त्यांचे क्रीडा स्वप्ने साकार करण्यास प्रोत्साहन मिळेल.
पदार्पण करणारे खेळाडू
पहिल्यांदा सहभागी होणाऱ्यांमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे – अतुल कौशिक (डिस्कस थ्रो एफ ५७), प्रवीण (डिस्कस थ्रो एफ ४६), हॅनी (डिस्कस थ्रो एफ ३७), मित पटेल (लांब उडी टी ४४), मनजीत (भाला फेक एफ १३), विशु (लांब उडी टी १२), पुष्पेंद्र सिंग (भाला फेक एफ ४४), अजय सिंग (लांब उडी टी ४७), शुभम जुयाल (शॉट पुट एफ ५७), वीरभद्र सिंग (डिस्कस थ्रो एफ ५७), दयावंती (महिला ४०० मीटर टी २०), अमिषा रावत (महिला शॉट पुट एफ ४६), आनंदी कुलंथायसम (क्लब थ्रो एफ ३२) आणि सुचित्रा परिदा (महिला भाला फेक एफ ५६).
भारतात पहिल्यांदाच होणार
ही स्पर्धा भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी पॅरा स्पर्धा मानली जाते. १०० हून अधिक देशांमधील २२०० हून अधिक खेळाडू आणि अधिकारी यामध्ये सहभागी होतील. एकूण १८६ पदकांसाठी स्पर्धा होणार आहेत आणि त्यामध्ये भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.