
कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाला उपविजेतेपद
छत्रपती संभाजीनगर ः राजर्षी शाहू महाविद्यालयातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत एमएसएम शारीरिक शिक्षण महाविद्यालय संघाने विजेतेपद पटकावले. कन्नडच्या शिवाजी महाविद्यालय संघाने उपविजेतेपद संपादन केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि राजर्षी शाहू कला व विज्ञान महाविद्यालय वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आंतरमहाविद्यालयीन पुरूष कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. गेल्या दोन दिवस झालेल्या या स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. शहरातील विविध महाविद्यालयाच्या एकूण १७ संघानी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता.
अंतिम सामना एमएसएम महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर व शिवाजी महाविद्यालय कन्नड यामध्ये झाला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात एमएसएम शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या संघाने शिवाजी महाविद्यालय कन्नड संघाला ३०-२७ अशा गुण फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले. शिवाजी महाविद्यालय कन्नड संघाला द्वितीय स्थानावर समाधान मानावे.
या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ मधुकर चाटसे हे होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डाॅ शिवाजी सूर्यवंशी, डॉ माणिक राठोड, कुलकर्णी, गोविंद शर्मा, डाॅ उदय डोंगरे, डॉ संदीप जगताप, वसंत झेंडे, काकासाहेब सूर्यवंशी, मंगेश डोंगरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक मधुकर वाकळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ कोक्कर यांनी केले तर डाॅ संजय कांबळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन सौंदर्य, वाय ई भालेराव, शितल बियाणी, विकास देशमुख, मनोहर जमधाडे, स्वप्ना गायकवाड, जी सूर्यकांत, विकी वाहुलकर यांनी परिश्रम घेतले.