
सचिव दिनकर हंबर्डे यांची माहिती
नांदेड ः महाराष्ट्र राज्य ज्युनियर (अंडर १९) ओपन व मुलींची फिडे रेटिंग निवड चाचणी बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा नांदेड येथे १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सुचिता हंबर्डे यांच्या सक्षम चेस अकॅडमीतर्फे तसेच नांदेड जिल्हा चेस अँड रॅपिड चेस असोसिएशन, महाराष्ट्र चेस असोसिएशन, एआयसीएफ व फिडे यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात येत आहे.
ही स्पर्धा १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत नॉलेज रिसोर्स सेंटर (लायब्ररी हॉल), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पार पडणार असून राज्यातील विविध वयोगटातील तरुण बुद्धिबळपटू यात आपले कौशल्य सादर करणार आहेत. एकूण ६० हजार रुपये पारितोषिक व १५१ बक्षिसे या स्पर्धेत ठेवण्यात आली असून, ही स्पर्धा राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे संयुक्त सचिव हेमेंद्र पटेल, नांदेड जिल्हा बुद्धिबळ अॅण्ड रॅपिड बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ साहेबराव मोरे, नांदेड जिल्हा चेस असोसिएशनचे सचिव डॉ दिनकर हंबर्डे, खजिनदार सुनील देशमुख बारडकर, सक्षम चेस अकॅडमीच्या संचालिका सुचिता हंबर्डे, अॅड श्रीदीप देशमुख लहानकर, नितीन देशमुख अर्धापुरकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.