महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांचा ऐतिहासिक निर्णय

  • By admin
  • September 9, 2025
  • 0
  • 91 Views
Spread the love

पंचांचे मानधन ३०० रुपयांवरुन थेट १ हजार, सागर मगरेला थेट नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर ः महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक जी श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध खेळांच्या क्रीडा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. पंचांचे मानधन ३०० रुपयांवरुन थेट एक हजार रुपये करण्यात आले. तसेच प्रा सागर मगरे यांना महापालिकेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय आयुक्तांनी जाहीर केला.

महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी हॉलमध्ये क्रीडा संघटकांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. या बैठकीला सर्व क्रीडा संघटक, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्व एकविध क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडा स्पर्धांबाबत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय योजना याबाबत सविस्तर मुद्देसूद मांडणी केली. यामध्ये प्रामुख्याने डॉ उदय डोंगरे यांनी विविध खेळांची आधुनिक कोचिंग, क्रीडांगणे याबाबत सविस्तर मांडणी केली. त्यानंतर महेश इंदापुरे यांनी देखील स्पर्धेबाबत माहिती सांगत असताना महत्त्वाचा विषय म्हणजे पंच मानधनाबाबत मांडणी केली. डॉ माणिक राठोड यांनी कबड्डी सारख्या खेळाच्या मैदानाची दुरावस्थेबाबत विषय मांडला. त्याचबरोबर महानगरपालिका अंतर्गत एखादे अद्ययावत कबड्डी खेळाचे मैदान मिळण्याबाबत आयुक्तांना विनंती केली. जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाकळे यांनी महानगरपालिके अंतर्गत सर्व खेळांचा क्रीडा महोत्सव घेण्यात यावा अशी सूचना केली. शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित खेळाडू सागर मगरे यांनी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत थेट नियुक्ती देण्याबाबत पूर्वी घेतलेल्या ठरावाची आठवण करून दिली.

सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हा सचिव गोकुळ तांदळे यांनी महानगरपालिका अंतर्गत विशेष करून महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात यावी आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात प्रामुख्याने खेळले जाणारे तसेच आवड असलेल्या खेळांची निवड करावी. तसेच ज्या खेळांना शासनाचा भरपूर निधी आहे किंबहुना शासनाचे विशेष लक्ष आहे ते खेळ वगळता इतर खेळाचे त्यामध्ये समावेश असावा असे सूचवले.

जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई व क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी देखील शासनाच्या योजना व क्रीडा स्पर्धेत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय योजनांची सविस्तर मांडणी केली. सर्व मागण्यांना उत्तर देताना आयुक्त जी. श्रीकांत यांनी सर्वप्रथम पंचांचे मानधन ३०० रुपयांवरुन थेट हजार रुपये इतके केले असा निर्णय जाहीर केला. कबड्डीचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी देखील त्वरित कारवाई करण्यात येत असल्याचे सुचवले. शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित सागर मगरे यांना आजच क्रीडा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती बाबत आदेश द्यावेत असे सूचवले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, उपायुक्त अंकुश पांढरे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महानगरपालिका क्रीडा विभाग प्रमुख विजय पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिन मुळे, जिल्हा ऑलम्पिक संघटनेचे पंकज भारसाखळे, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित प्रा एकनाथ साळुंखे, डॉ उदय डोंगरे, डॉ संदीप जगताप, गोकुळ तांदळे, प्रा सागर मगरे, महानगरपालिका शिक्षण विभागाचे भरत तीनगोटे, डॉ माणिक राठोड, डॉ प्रसाद कुलकर्णी, विजय सिंगारे, महेश इंदापुरे, राज जैस्वाल, दत्तू पवार, मोहम्मद बद्रुद्दीन, सतीश पाठक, प्रशांत जमदाडे, गणेश बेटूदे, भीमा मोरे, अजय भटकर, किरण परदेशी, रफिक जमादार, अरुण पायकडे, उमर खान, अजित बलवान, रोहित गाडेकर, नारायण शिंदे, अमोल थोरात, संतोष अवचार, विश्वास जोशी, अमित साकला, डॉ मुरलीधर राठोड, गणपत पवार, डी आर खैरनार, प्रा राकेश खैरनार, डॉ कैलास शिवणकर, विनायक राऊत, रुस्तुम तुपे, निलेश हारदे, सुरेश मिरकर, अनिल मिरकर, उदय कहाळेकर, मंजित सिंग दरोगा, राहुल टाक, सचिन लव्हेरा आदी एकविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका क्रीडा अधिकारी संजीव बालय्या यांनी सर्वांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *