अफगाणिस्तान संघाचा हाँगकाँगवर ९४ धावांनी दणदणीत विजय

  • By admin
  • September 9, 2025
  • 0
  • 2 Views
Spread the love

अबु धाबी : आशिया कप टी २० क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने हाँगकाँग चायना संघाचा ९४ धावांनी पराभव करत शानदार विजयी सलामी दिली.

हाँगकाँग संघासमोर विजयासाठी १८९ धावांचे आव्हान होते. खराब फिल्डिंगनंतर हाँककाँग संघाच्या डावाची सुरुवात देखील खराब झाली. त्याचा मोठा फटका हाँगकाँग संघाला बसला. झीशान अली (५), अंशुमन रथ (०), निजाकत खान (०), कल्हण छल्लू (४) या आघाडीच्या फलंदाजांनी संघाची मोठी निराशा केली. खान व छल्लू हे धावबाद झाले. किंचित शाह (६) याला नूर अहमदने बाद करुन हाँगकाँगला पाचवा धक्का दिला.

पाच बाद ४३ अशा स्थितीतून हाँगकाँग संघाचा डाव सावरू शकला नाही. बाबर हयात याने सर्वाधिक ३९ धावा काढल्या. त्याने तीन टोलेजंग षटकार मारले. बाबरचा अपवाद वगळता हाँगकाँगचा आघाडीचा एकही फलंदाज धावांचा दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्यानंतर तळाला फलंदाजी करताना कर्णधार यासीन मुर्तझा याने १६ धावांचे योगदान दिले. हाँगकाँग चायना संघाने २० षटके फलंदाजी करत नऊ बाद ९४ धावा काढल्या. अफगाणिस्तानकडून फारुकी (२-१६), गुलबदिन नायब (२-८) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. उमरझाई (१-४), रशीद खान (१-२४), नूर अहमद (१-१६) यांनी प्रत्येकी एक बळी घेत विजयात आपला वाटा उचलला.

अफगाणिस्तानची खराब सुरुवात

अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात खराब झाली. गुरुबाज (८), इब्राहिम झद्रान (१) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर सेदिकुल्लाह अटल व नबी या जोडीने डाव सावरला. नबीने ३३ धावा फटकावल्या. त्यानंतर गुलबदिन (५) लवकर बाद झाला.

चार बाद ९५ अशा खराब स्थितीतून संघाला बाहेर काढण्याचे काम सेदिकुल्लाह अटल व अझमतुल्लाह या जोडीने केले. अटल याने ५२ चेंडूत नाबाद ७३ धावा फटकावल्या. त्याने सहा चौकार व तीन षटकार मारले. अझमतुल्लाह याने अवघ्या २१ चेंडूत ५३ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने तब्बल पाच उत्तुंग षटकार ठोकले. त्याने दोन चौकारही मारले. त्याच्या खेळीने सामन्याचे चित्र बदलून गेले. अफगाणिस्तान संघाने २० षटकात सहा बाद १८८ धावसंख्या उभारुन सामन्यावर आपली पकड अधिक भक्कम केली.

हाँगकाँग चायना संघाकडून आयुष शुक्ला (२-५४), किंचित शाह (२-२४) यांंनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अतीक इक्बाल (१-३२) व एहसान खान (१-२८) यांनी एकेक बळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *