
जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त आयोजन
नाशिक ः जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ’हेल्थ एजिंग’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील भौतिकोपचार विषयातील तज्ज्ञ डॉ सागर महाजन यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी भौतिकोपचार विषयातील डॉ सागर महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नियमित शारीरिक हालचालींमुळे अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो. हृदय रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह काही प्रकारचे कर्करोग आणि हाडांचे आजार यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. निरोगी वाढत्या वयाचा प्रवास सोपा करण्यासाठी फिजिओथेरपिस्टची मदत घेणे आवश्यक आहे.
फिजिओथेरपिस्ट आपल्या गरजेनुसार एक वैयक्तिक व्यायाम कार्यक्रम तयार करुन देतात. आपली ताकद, तोल, समन्वय आणि लवचिकतेवर लक्ष केंद्रित करुन व्यायाम करावेत. फिजिओथेरपीमुळे केवळ अशक्तपणाचा प्रतिबंधच होत नाही, तर तो व्यवस्थापित करण्यास मदत मिळते. वृध्दापकाळ म्हणजे केवळ आराम करणे किवा निष्क्रिय राहणे हा गैरसमज काढून टाकावा.
ते पुढे म्हणाले की, वाढत्या वयासोबत येणाऱ्या शारीरिक मर्यादांमुळे अनेकदा व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातून सक्रियता कमी करतात. आधुनिक विज्ञान आणि फिजिओथेरपी उपचार पध्दतीने आपण उत्साहाने राहू शकतो. प्रत्येकान निरोगी व दीर्घायुष्य जीवन जगण्यासाठी आठवडयातून किमान २-३ दिवस सर्व स्नायू गटांसाठी ताकद वाढवणारे आणि तोल सुधारणारे व्यायाम करावेत असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन गायकवाड यांनी सांगितले की, अनेकांना कंबरदुखी, पाठदुखी ही एक सामान्य समस्या जाणवते. फिजिओथेरपी उपचार पध्दतीनुसार व्यायाम केल्यास वेदना कमी करण्यास मदत होते. शरिराच्या अन्य समस्या टाळण्यासाठी व स्नायूंना बळकट करण्यासाठी योग्य व्यायामाने फरक पडतो असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी सांगितले की, वाढत्या वयोमानानुसार प्रत्येकाने शरिराची काळजी घेणे आवश्यक आहे. याकरीता योग्य व्यायाम व शरिराची नियमित हालचाल करावी. फिजिओथेरपी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शारिरीक व्याधी टाळण्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन गायकवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे, नितिन शिंदे, चंद्रशेखर दळवी, संदीप ततार, लक्ष्मीछाया जगागीरदार, सुवर्णा खैरनार, डॉ अनुश्री नेटके आदी अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेकरीता विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील मानसी हिरे, अनिल पावरा, दिगंबर खैरनार, मनोहर गवळी, गायत्री चौधरी यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेकरीता विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.