
एल अल्टो (बोलिव्हिया) -ः दक्षिण अमेरिकन विश्वचषक पात्रता स्पर्धेत बोलिव्हिया संघाने ब्राझीलचा १-० असा पराभव करून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. टेरसेरोसने ४५ व्या मिनिटाला गोल करून बोलिव्हियन संघाला २०१९ नंतर ब्राझीलवर पहिलाच घरचा विजय मिळवून दिला.
प्लेऑफ स्पर्धेत सहा देशांचा समावेश असेल आणि मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय हंगामादरम्यान हा सामना खेळवला जाईल, ज्यामुळे पुढील वर्षी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी अंतिम दोन स्थान निश्चित होतील. बोलिव्हिया चौथ्यांदा आणि १९९४ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्र होण्याचे लक्ष्य ठेवेल.
पात्र फेरीत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या कोलंबिया संघाने स्ट्रायकर लुईस डियाझच्या शानदार कामगिरीमुळे व्हेनेझुएलाचा ६-३ असा पराभव करून बोलिव्हियाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यास मदत केली. डियाझ याने चार गोल केले. दुसऱ्या एका पात्रता सामन्यात, इक्वेडोरने अर्जेंटिनाचा १-० असा पराभव केला. दक्षिण अमेरिकन पात्रता फेरीत अर्जेंटिनाने ३८ गुणांसह पहिले स्थान पटकावले, तर इक्वेडोरने २९ गुणांसह दुसरे स्थान पटकावले.