
डेरवणच्या एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन, २४ संघांचा सहभाग
डेरवण ः जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत १७ व १९ वर्षांखालील गटात एकूण २४ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत दि मॉडेल इंग्लिश स्कूल आणि पटवर्धन हायस्कूल या संघानी दुहेरी मुकुट पटकावला.
जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा डॉजबॉल असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल डेरवण यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन डेरवण क्रीडा संकुलामध्ये करण्यात आले होते.
या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये १७ वर्षांखालील मुले-मुली व १९ वर्षांखालील मुले-मुली अशा एकूण २४ संघानी सहभाग नोंदवला होता. रत्नागिरी जिल्ह्यातून विविध शाळातून हे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने डेरवण क्रीडा संकुलाचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी सुनील कोळी, रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष उदयराज कळंबे, रत्नागिरी जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, रत्नागिरी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती ऋतुजा जाधव आणि जिल्ह्यातील विविध शाळेतील क्रीडा शिक्षक व व्यवस्थापक आणि खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय खेळाडूचा सन्मान करीत अॅथलेटिक्स राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू क्रांती म्हस्कर हिच्या हस्ते करण्यात आले. या जिल्हास्तरीय स्पर्धा यशस्वी संपन्न करण्याकरता तांत्रिक कमिटी प्रमुख आणि राष्ट्रीय खेळाडू व पंच प्रथमेश रसाळ आणि सर्व पंच यानी मेहनत घेतली.
अतिशय मनोरंजक चपळ, वेगवान व आनंद देणाऱ्या या डॉजबॉल खेळाच्या स्पर्धेमध्ये सर्व संघाने अतिशय चुरशीचा खेळ करून, सामन्यात सहभाग घेऊन प्रेक्षकांची मने जिंकली.
१७ वर्षे वयोगटामध्ये मुलांच्या विभागात प्रथम क्रमांक दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे तर द्वितीय क्रमांक पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी आणि तृतीय क्रमांक सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरी यांनी पटकावला.
१७ वर्षे वयोगटामध्ये मुलींच्या विभागात प्रथम क्रमांक दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे तर द्वितीय क्रमांक सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरी आणि तृतीय क्रमांक पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी यांनी पटकावला.
१९ वर्षे वयोगटामध्ये मुलांच्या विभागात प्रथम क्रमांक पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी तर द्वितीय क्रमांक माखजन इंग्लिश स्कूल माखजन आणि तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालय वरवडे यांनी पटकावला.
१९ वर्षे वयोगटामध्ये मुलींच्या विभागात प्रथम क्रमांक पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी तर द्वितीय क्रमांक माखजन इंग्लिश स्कूल माखजन आणि तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालय वरवडे यांनी पटकावला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोमनाथ भिंगे अमृत कडगावे विनायक पवार अविनाश पवार आणि क्रीडा संकुलातील सर्व कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली.